Saturday 22 October 2016

युद्धज्वर | War Fever


तुम्हाला युद्धकथा वाचायला, युद्धपट पहायला आवडत असेल, युद्ध व्हावं असं वाटत असेल तर त्याचा अर्थ तुम्हाला इतिहास, साहस यांची आवड आहे किंवा तुम्ही देशभक्त आहात असा होत नाही. खरं म्हणजे प्रत्यक्षातल्या, पुस्तकातल्या किंवा पडद्यावरच्या युद्धात तुमचा कांहीच सहभाग नसतो, तिथं तुम्ही केवळ एक ‘बघे’ असता. तुमचं हे ‘बघेपण’ तुमच्या सुप्त किंवा उघड मनात असलेल्या रक्तपाताच्या आदिम आकर्षणामुळं आलेलं असत. तुम्हाला विध्वंस बघायचा असतो. सैनिक, जनता मरताना बघायचे असतात. हे बघत असताना तुम्ही त्यात गुंतून जाता. तुम्ही जे करू शकत नाही ते दुसरं कोणीतरी करतंय याचा तुम्हाला आनंद होत असतो. तुमचं हे गुंतून जाणं हे तुमच्या देशाच्या बाजूनं असतं. त्या युद्धात जर तुमचा देश सामील नसेल तर गुंतून जाण्यासाठी तुम्ही त्यातला एखादा तुम्हाला योग्य वाटणारा देश निवडता.

या विकृत आनंदात तुमचं कांहीच बिघडत नसतं. ना तुम्हाला लढावं लागतं, न रक्त सांडावं लागतं. तुमच्या अंगावर एखादा ओरखडादेखील उठत नाही. तुमच्या घरातले सगळेजण सुरक्षित असतात. तुमचं घरही सुरक्षित असतं, कारण त्यावर बॉम्ब पडत नसतो.

खरोखरीचं युद्ध तुमच्या घरापर्यंत पोहोचलं तर? अहो, तुमच्या गल्लीत गुंड शिरले तर तुम्ही दारं बंद करून लपून बसता, मग सैनिक शिरले, किंवा तुमच्या शहरावर शत्रूची विमानं घिरट्या घालू लागली तर तुमची काय अवस्था होईल याची कल्पना करा. (काय म्हणता,शत्रूची विमानं तुमच्या शहरापर्यंत पोहोचूच शकत नाहीत आणि त्यांचे सैनिक आमच्या गल्लीत शिरण्याचा प्रश्नचं येत नाही कारण आमचे सैनिक त्यांना आत येऊनच देणार नाहीत? बरं, मग यात तुमचं काय कर्तृत्व आहे? सैनिकांच्या जीवावर तुमची युद्धखोर मानसिकता?)

No comments:

Post a Comment