Wednesday 29 March 2017

तुमची ठाम मतं!

तुमच्या जीवनात असा एखादा प्रसंग येतो की त्यामुळं तुमच्या ठाम मतांना धक्का बसतो. तुम्ही आजपर्यंत जे समजत होता, हिरीरीने मांडत होता ते पूर्णपणे चुकीचं होतंयाची तुम्हाला जाणीव होते. पण हे मोकळेपणानं कबूल करण्याचं तुमच्यात धाडस नसतं. कारण तुमचा अहंकार. अहंकारी माणूस आपण चूक होतो हे कसं काय बरं कबूल करेल? बरं, तुमची ठाम मत मांडताना तुम्ही कित्येकदा दुसऱ्यांचा अपमान केलेला असतो, अनेक माणसं तुमच्यापासून दूर झालेली असतात. आता तुमची मतं बदलली असली तरी त्या दूर गेलेल्या लोकांना जवळ करण्यातही तुमचा अहंकार आडवा येतो. बरं तुमची ही ठाम मत असतात तरी कशाबद्दल? तर राजकारणी, सेलेब्रिटी, खेळाडू आणि तुमचा संबंध नसलेल्या व्यक्ती आणि घटनांच्याबद्दल. म्हणजे संबंध असणाऱ्या लोकांच्यापेक्षा संबंध नसणारे लोक तुम्हाला महत्वाचे वाटतात. गोंधळच आहे सगळा!

Thursday 9 March 2017

दुसऱ्यांचा निषेध करणं थांबवा!

दुसऱ्यांचा निषेध करणं म्हणजे मोठा पराक्रम नव्हे. तुम्ही कुणाकुणाचा, कशा-कशाचा निषेध करणार आहात? त्यापेक्षा तुम्ही इग्नोर करायला शिकायला पाहिजे. ज्या गोष्टींचा तुमच्याशी संबंध नाही तिथं तुम्ही लक्ष घालायचं कारण नाही. तुमच्या निषेधानं कांही फरकही पडत नसतो. तरीही तुम्हाला निषेध करायची हौस असेल तर तुम्ही स्वत:चा निषेध करायला शिका. तुम्ही स्वत:ही अनेक चुकीच्या गोष्टी करत असता, तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक नसता, तुम्ही दिलेला शब्द पाळत नाही, तुम्हीही बेजबाबदारपणे वागता, बेजबाबदार बरळता.... स्वत:चा निषेध करण्यासारख्या तुमच्याकडं अनेक गोष्टी आहेत. दुसऱ्यांचा निषेध करायचं तुम्ही बंद केलंत आणि स्वत:च्या चुकांचा निषेध करायला सुरवात केलीत तर तुमच्या जीवनात खूप मोठे, चांगले बदल घडतील –महावीर सांगलीकर