Tuesday, 4 April 2017

दुकानदारी

अनेक दुकानदारांचं गिऱ्हाईकाशी बोलणं, वागणं विचित्र असतं. अशा दुकानदारांच्या तोंडावर प्रसन्नता, हसू या गोष्टी नसतात. चेहऱ्यावर नेहमी बारा वाजलेले असतात. त्यांना दुकानात गिऱ्हाईक येणं म्हणजे एक संकटच वाटत असतं. एखादं गिऱ्हाईक आलं आणि त्यानं एखादी वस्तू मागितली आणि ती नसली तर त्या दुकानदाराची ‘नाही’ म्हणून सांगण्याची पद्धत फार विचित्र असते. विचित्र हातवारे करत, तोंडाने ‘च्यक्क’ असा विचित्र आवाज काढत तो दुकानदार त्या गिऱ्हाईकाला पिटाळून लावतो. सुट्टे पैसे नाहीत म्हणून गिऱ्हाईक नाकारणारे, दुकान बंद होत असताना गिऱ्हाईक आले तर त्याला परत पाठवणारे दुकानदार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. गिऱ्हाईकाचा अपमान करणारे, त्यांच्याशी भांडणे करणारे दुकानदार देखील असतात. असे सगळे दुकानदार दुसरं कांही करता येत नाही म्हणून दुकानदारी करणारे लोक असतात, तसेच ते मनोविकृतही असतात. त्यांच्या या विचित्र वागण्यामागे बऱ्याचदा त्यांच्या कुटुंबातले ताणतणाव असतात. अशा दुकानदारांच्यावर मानसोपचार करणे आवश्यक आहे. ज्या दुकानदारांना गिऱ्हाईकाशी कसं वागावं हे कळत नाही, त्यांनी दुकान कायमचे बंद करून कुठेतरी नोकरी पकडावी. नाहीतरी त्यांचं दुकान बंद पडणारच असतं.    

No comments:

Post a Comment